वि. वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या नावाने मराठीत विपुल आणि दीर्घकाळ कविता लिहिली. जीवनलहरी (१९३३) ते मारवा (१९९९) अशा काव्यसंग्रहांतून उलगडणारा त्यांच्या काव्याचा प्रदीर्घ पट थक्क करणारा आहे. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने तर इतिहास घडवला. त्यांची तेजोमयी कविता अनेकांना भावली ती तिच्यातील ओजस्वितेमुळे आणि चिंतनशीलतेमुळेही. कुसुमाग्रजांचा या प्रदीर्घ काव्यप्रवासाच्या पाऊलखुणा अधोरेखित करणारे, त्यांच्या निवडक कवितांचे संकलन असलेले 'रसयात्रा' आणि 'प्रवासी पक्षी' हे दोन काव्यसंग्रह इथे श्राव्य पुस्तकांच्या स्वरूपात देण्यात आले आहेत. कविवर्य बा. भ. बोरकर आणि ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. शंकर वैद्य यांच्यासारख्या रसिकाग्रणींनी निवडलेल्या या कविता कुसुमाग्रजांच्या अनवरत काव्यसाधनेची यथार्थ कल्पना रसिकांना देतात. नामवंत कलावंतांनी या कवितांचे अभिवाचन केले आहे. मराठी रसिकांना हा ठेवा राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही पुस्तके श्राव्य पुस्तकांच्या स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी कॉण्टिनेण्टल प्रकाशन आणि पॉप्युलर प्रकाशन यांनी संस्थेला अनुमती दिली आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

या श्राव्य पुस्तकांचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून ही पुस्तके जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. नक्कल करून त्यांची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इ. गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

श्राव्य पुस्तक निवडा
१. प्रवासी पक्षी

२. रसयात्रा
इतर श्राव्य पुस्तके  निवडा 

 

कृष्णाकाठ

कविता विंदांची

दासबोध