राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

राज्य मराठी विकास संस्थेचे प्रकल्प व उपक्रम यांची महिती

दिनांक: ०१ नोव्हेंबर २०१४


१. दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश व साहित्यसूची
दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे असे दोन प्रवाह आहेत. अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग यांमुळे हे साहित्य काही प्रमाणात वाचकांच्या दृष्टीने दुर्बोध राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नसल्याने तसेच ह्या साहित्यामधून जे नवनवीन आणि अपरिचित शब्द मिळतात ते प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशीलांसह या कोशात दिलेले आहेत. तो विशिष्ट शब्द असलेले साहित्यकृतीतील मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या त्या नोंदीमध्ये दिलेले आहे. या कोशाचे खंड- १ व २ प्रकाशित झाले असून तिसऱ्या खंडाची अंतिम मुद्रणप्रत तयार करण्याचे काम सुरू आहे.

'दलित-ग्रामीण साहित्य : रूढी, प्रथा, परंपरा, विधीकोश'
दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश या प्रकल्पाचाच हा एक भाग असून त्यामध्ये दलित व ग्रामीण साहित्यकृतींमधून आलेल्या विविध जाती-जमातींच्या विधी, रूढी, प्रथा, परंपरा, श्रद्धा, समजुती, सण-उत्सव, नवस-सायास, दैवत, लोकाचार इत्यादी विषयांच्या अनुषंगाने सांस्कृतिक संदर्भ असलेल्या अनेक संकल्पनांचे संकलन करून त्यांची सचित्र स्पष्टीकरणात्मक माहिती या कोशातून दिलेली असून हा कोश प्रकाशित करण्यात आला आहे.

२. वस्त्रनिर्मिती माहितीकोश
वस्त्रोद्योगाची सर्वांगीण व अद्ययावत माहिती मराठी भाषेतून उपलब्ध करून देणारा 'वस्त्रनिर्मिती माहितीकोश' हा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्था आणि दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था, इचलकरंजी यांनी सयुक्तपणे कार्यान्वित केलेला प्रकल्प आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानामुळे भारतातील वस्त्रोद्योगाचा, वस्त्रनिर्मितीकलेचा विकास कसा कसा होत गेला ते विकासाचे टप्पे, भारतीय वस्त्रोद्योगाचे आजवरचे स्वरूप त्याची वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती, महाराष्ट्राचे या उद्योगामधील स्थान, होऊ घातलेले जागतिकीकरण या सर्वांचा साकल्याने विचार या कोशात करण्यात आला आहे.

मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात वस्त्रोद्योगाला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान आहे, परंतु या विषयासंबंधी फारच थोडे दर्जेदार लिखाण मराठी भाषेत उपलब्ध आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी सर्वसामान्य जिज्ञासूला समजेल अशी माहिती या कोशात देण्यात आली आहे. या माहितीकोश प्रकल्पांतर्गत एकूण नऊ खंड संकल्पित असून संस्थेने आतापर्यंत पुढील चार खंडांचे प्रकाशन केलेले आहे.

खंड-१. तंतुनिर्माण व तंतुविज्ञान : तंतूंची उत्पादन प्रक्रिया, त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, त्यांच्या उपयोगाची विविध क्षेत्रे तसेच या तंतूंच्या परीक्षण-पद्धतींविषयीची सविस्तर माहिती या खंडात दिली आहे.

खंड - २ - सूतनिर्माण - सुताची गुणवत्ता मोजण्याच्या विविध पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी उपकरणे, सूतनिर्मितीच्या पद्धती या सर्वांचा तपशील प्रस्तुत खंडात देण्यात आलेला आहे.

खंड-३ - कापडनिर्माण - कापडाची रचना आणि त्यावर प्रभाव टाकणारे विविध घटक, कापडाच्या विणी, कापडातील दोष, त्यांची कारणे आणि प्रतिबंधक उपाय, कापडाची गुणवत्ता मापण्याची पद्धती आणि त्यासाठी लागणारी उपकरणे, वस्त्र आणि वस्त्रनिर्माण या प्रक्रियासंबंधीची पायाभूत गणिते आदींची सविस्तर माहिती या खंडात दिली आहे.

खंड-४ - रासायनिक प्रक्रिया - सर्व महत्त्वाचे नैसर्गिक आणि मानव-निर्मित तंतू विचारात घेऊन आवश्यक त्या रासायानिक प्रक्रिया आणि यंत्र-सामग्री यांची सविस्तर माहिती या खंडात दिलेली आहे.

माहितीकोशाच्या उर्वरित पाच खंडांचे काम सुरू असून, या खंडांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. खंड-५ - फॅशन व वस्त्रप्रावरणे, खंड-६ - तंत्रोपयोगी वस्त्रे, खंड-७ - वस्त्रोद्योग व्यवस्थापन, खंड-८ -वस्त्रसंकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार, खंड-९ - वस्त्रोद्योग परिभाषाकोश.

३. मराठी ग्रंथसूचिमाला (१९५१-२०००)
शं. ग. दाते यांनी १९५० पर्यंतच्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची दोन भागांत तयार केली होती. ही सूची बरीच वर्षे अनुपलब्ध असल्याने तिचे नवीन परिशिष्टांसह पुनर्मुद्रण संस्थेने केले. इ. स. १९५० नंतर मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एकत्रित अशी विषयवार ग्रंथसूची उपलब्ध नसल्याने राज्य मराठी विकास संस्थेने 'मराठी ग्रंथसूचिमाला ' हा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत इ. स. १९५१ ते २००० या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्यात येत आहे. आतापर्यत या मालेतील चार भाग --- भाग ३ (१९५१-१९६२), भाग ४ (१९६३-१९७०), भाग ५ (१९७१-१९७८) आणि भाग ६ (१९७९-१९८५) --- प्रकाशित करण्यात आले आहेत. इ. स. २००० पर्यंतच्या कालखंडातील ग्रंथांची नोंद करणाऱ्या पुढील भागांचे काम चालू आहे.

४. भारतातील विविध राज्यांतील व जगातील अनेक देशातील मराठी भाषिकांसाठी उपक्रम, कार्यक्रम
मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात इत्यादी राज्यातील शाळांना महत्त्वाची पुस्तके पाठवण्याचे काम संस्था करत असते. १९९४ पासून संस्थेने आंध्रप्रदेशातील महाराष्ट्र मंडळ हैद्राबाद यांना व त्यांनी सुचविलेल्या शाळांतील १ली ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थांना बालभारती, कुमारभारती, युवकभारती अशी मराठीची पाठ्यपुस्तके पाठविण्यात येतात. महाराष्ट्र मंडळ ही पुस्तके विद्यार्थी प्रतिष्ठान महाराष्ट्र मंडळ (आंध्र प्रदेश) यांच्यामार्फत संबंधित शाळांना वितरित करीत असते. तसेच गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील मराठी मंडळांच्या शाळांना दैनिक लोकसत्ता व पुणे सकाळ ही वर्तमानपत्रे पाठविण्यात येतात.

इतर राज्यातील व देशातील मराठी वाचकांना दर्जेदार मराठी पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत या उद्देशाने संस्थेने २००३ पासून ग्रंथालयांना व मराठी मंडळांना ग्रंथभेट हा उपक्रम हाती घेतला आहे. आजपर्यंत हैद्राबाद, बेळगाव, भोपाळ, सुरत, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, रायपूर, इंदूर, राजकोट, जबलपूर इत्यादी ठिकाणच्या २३ ग्रंथालयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट म्हणून पाठविण्यात आली आहेत. तसेच अमेरिकेतील मराठी मंडळांनाही संस्थेने तीन वर्ष ललित साहित्याची पुस्तके पाठविली आहेत. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात संस्थेने सिकंदराबाद, इंदूर, रायपूर, बेळगाव, जयपूर, भोपाळ, तंजावर, कोलकत्ता, वाराणसी, पुणे इ. ठिकाणच्या १३ मराठी मंडळांना पुस्तके पाठवली आहेत.

५. वाराणसी (बनारस) येथील मराठी भाषेचा सांस्कृतिक व समाजभाषावैज्ञानिक अभ्यास
भारतातील इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जेथे मराठी समाज आहे, त्यांचा सांस्कृतिक व समाजभाषावैज्ञानिक अभ्यास करून त्यांची भाषा व संस्कृती यांच्या सद्यस्थितीचा संशोधनात्मक आढावा घेऊन त्या माहितीचा उपयोग बहुउद्देशीय पद्धतीने करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.
या प्रकल्पांतर्गत वाराणसी येथे बोलली जाणारी मराठी भाषा व प्रमाण मराठी भाषा यांतील फरकाचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास करणे अपेक्षित असून, वाराणसीमधील भाषिकांची प्राथमिक पाहणी, भाषिकांची एकूण संख्या, स्त्री-पुरुष, वयोगटाप्रमाणे (लोकसंख्या) इ. माहिती मिळवणे, काही निवडक भाषकांच्या भाषिक नमुन्यांचे ध्वनिमुद्रण करणे, येथील मराठी भाषकांशी संपर्क साधून ठरविलेली संशोधनाची साधने वापरून भाषिक नमुने व माहिती मिळवणे, गोळा केलेल्या भाषिक नमुन्यांच्या माहितीचे विश्लेषण करणे, सर्व संकलित माहितीचे मराठीत लेखन करून मांडणी करण्याचे काम सुरू आहे.

६. मराठी मंडळांची माहिती पुस्तिका (सांस्कृतिक धोरण २०१०)
या प्रकल्पांतर्गत भारतातील व परदेशातील सर्व मराठी मंडळांची अद्ययावत माहिती पुस्तिका व सीडी मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये तयार करण्याचे काम चालू आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ६८ मराठी मंडळांची माहिती मिळाली आहे. तसेच न्यूझीलॅंड, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलॅंड, नेदरलॅंड, केनिया, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झरलॅंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा (ओटावा), नॉर्वे, थायलॅंड, मॉरिशस, डेन्मार्क, मस्कत या देशांतील मराठी मंडळांचीही माहिती मिळाली आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती संकलित करण्यासाठी या मंडळांशी संपर्क करण्यात येत आहे.

७. विधि व न्याय व्यवहारात मराठीचा वापर
राज्य मराठी विकास संस्थेने ‘मराठीतून विधि व न्यायव्यवहार’ या विषयावर १९९५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व मुंबई विद्यापीठाचा विधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रानंतर “महाराष्ट्र राजभाषा (विधि व न्यायव्यवहार) आयोग“ स्थापन करण्याच्या दृष्टीने एका विधेयकाचे प्रारूप तयार करून शासनास पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले. महाराष्ट्र शासनाने निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विधि अनुवाद व परिभाषा सल्लागार समिताचे सदस्यत्व संस्थेला दिलेले असून त्या समितीमार्फत केल्या जाणाऱ्या विधि अनुवादाच्या कामामध्ये भाषिकदृष्ट्या गुणवत्ता निर्माण व्हावी यासाठी संस्था त्यांना सहकार्य करते.

८. संगणकावर मराठी
संगणकावर मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. विशेषतः प्रमाणीकरण (स्टॅण्डर्डायझेशन) व कन्व्हर्जन या कामी संगणकतज्ज्ञांना भाषिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्याचे कार्य संस्थेने केले आहे. कळफलकाच्या एकरूपतेसाठीही मराठी वर्णमालेचे प्रमाणीकरण तसेच मराठीतील अकारविल्हे रचना (sorting orders) निश्चित करणे आवश्यक होते. ही गरज ओळखून संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, भाषातज्ज्ञ व संगणकतज्ज्ञ यांच्या सहकार्याने वर्णमाला व वर्णक्रम ह्यांच्या प्रमाणीकरणासंदर्भात एक अहवाल तयार करुन शासनाला सादर केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी वर्णमाला आणि वर्णलिपिविषयक शासननिर्णय (शासन निर्णय, क्रमांक – मभावा-२००४/(प्र.क्र./२५/२००४)/२० ब दिनांक ६ नोव्हेंबर २००९) प्रसृत केला.

९. मराठी संकेतस्थळांची स्पर्धा
युनिकोड प्रणालीमुळे संगणकावर मराठीतून माहितीची देवाण-घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठीही प्रयत्न होत आहेत. महाजालावर कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागली आहे. ह्या व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या तसेच त्यात गुणात्मक वाढ होण्याच्या हेतूने राज्य मराठी विकास संस्था संकेतस्थळांची स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शासकीय व अशासकीय संकेतस्थळांचे तज्ज्ञांद्वारा परीक्षण करून पुरस्कारासाठी पात्र अशा संकेतस्थळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. आजवर २००६, २०१०, २०१२, २०१३ ह्या वर्षी संस्थेने अशा मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

१०. विज्ञानविषयक पुस्तकांचे अनुवाद
विज्ञानप्रसार, दिल्ली ह्या संस्थेच्या विज्ञानविषयक लोकलक्ष्यी अशा ५ पुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विज्ञान परिषद ह्यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत चालले आहे. या मालिकेतील ' का ? आणि कसे ? आणि ' तारकांशी मैत्री' ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. सर्वसामान्य व्यक्तींना कळेल अशा सोप्या रीतीने विज्ञानातील तत्त्वे या पुस्तकांतून स्पष्ट करण्यात आली आहेत.

११. मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके (ऑडिओ सीडी)
या प्रकल्पांतर्गत मराठीतील प्रसिद्ध निवडक संतसाहित्य तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांचे साहित्य, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्य व महाराष्ट्र शासन पारितोषिक विजेते निवडक साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके तयार करण्यात येणार असून, आतापर्यंत कृष्णाकाठ (स्व. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र) व श्री दासबोध (श्री समर्थ रामदास) या ग्रंथांची श्राव्य पुस्तके तयार करण्यात आली आहेत. ही पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावरून जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या ऑडिओ सीडीही संस्थेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांचे अनुक्रमे रसयात्रा व प्रवासी पक्षी तसेच संहिता आणि आदिमाया ह्या कवितासंग्रहांची श्राव्य पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहेत.

१२. युनिको़डआधारित मराठी टंक
महाजालावर आणि संगणकावर युनिकोड ही संकेतप्रणाली वापरून मराठीचा वापर वाढत असला तरी संगणकाच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी टंक संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यांतील बहुसंख्य टंक हे महाराष्ट्र शासनाने प्रसृत केलेल्या दिनांक ६ नोव्हेंबर २००९ च्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात मान्य केलेल्या निकषांप्रमाणे नसल्यामुळे या शासन निर्णयांतील निकषांशी जुळतील असे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी टंक तयार करून घेऊन ते जनतेला मुक्त ( फ्री ॲण्ड ओपन सोर्स ) परवान्यांतर्गत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यांपैकी दोन टंकांचे काम पूर्ण झाले असून ते संस्थेच्या संकेतस्थळावर (https://rmvs.maharashtra.gov.in/Taank.html) उतरवून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ ह्या दोन टंकांना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत.

१३. मोडी हस्तलिखितांचे मराठीकरण व विषय-सूची-खंड तयार करणे
तमिळ विद्यापीठ, तंजावर येथील मोडी हस्तलिखितांचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प संस्थेने माहे मार्च २०१३ मध्ये तमिळ विद्यापीठ, तंजावर यांच्याबरोबर करार करून सुरू केलेला आहे. या प्रकल्पांतर्गत अतिमहत्त्वाच्या पाच लाख मोडी हस्तलिखितांचे जतन व संवर्धन करण्यासाठी, पूर्वतयारी म्हणून त्यांची साफसफाई, दुरुस्ती करून त्यांची विषयाप्रमाणे सूची (कॅटलॉग) तयार करणे व ती कागदपत्रे संगणकावर (डिजिटायजेशन) आणणे व त्या कागदपत्रांचे मराठीकरण करून ते प्रकाशित करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. सध्या यातील पाच लाख हस्तलिखितांपैकी ३ लाख ५ हजार ४८० इतक्या कागदपत्रांची साफसफाई, कागदपत्रांच्या घड्या काढणे, फाटलेली व जीर्ण झालेली हस्तलिखितांची दुरुस्ती करण्याची कामे पूर्ण झालेले असून, ती कागदपत्रे संगणकीकरण्यासाठी (डिजिटायजेशन) तयार केलेली आहेत. या कागदपत्रांचे संगणकीकरण करण्याची कार्यवाही चालू आहे.

१४. शासकीय प्रकाशनांचे प्रदर्शन
विविध शासकीय विभाग तसेच शासन पुरस्कृत संस्था यांनी प्रकाशित केलेली दर्जेदार मराठी पुस्तके लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय पुस्तकवर्षाचे निमित्त साधून २००२ मध्ये पहिल्यांदा विविध शासकीय विभाग तसेच शासन पुरस्कृत संस्था यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मुंबई येथे संस्थेने आयोजित केले. त्यानंतर दरवर्षी शासकीय प्रकाशनाचे प्रदर्शन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संस्था स्वतंत्रपणे आयोजित करीत असते तसेच इतरत्र निमंत्रित केलेल्या प्रदर्शनांमध्ये संस्थेचा सहभाग असतो.

१५. प्रासंगिक उपक्रम
मराठीचा गुणवत्तापूर्वक विकास करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील मराठीचा वापर वाढवण्यासाठी संस्थेतर्फे मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांच्याशी निगडित प्रश्नांवर विविध विद्यापीठे, संस्था, महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने किंवा स्वतंत्रपणे चर्चासत्रे, कार्यशाळा, सर्वेक्षणे आयोजित करण्यात येतात. संस्थेने आजवर अशा अनेक चर्चासत्रांचे व कार्यशाळांचे आयोजन केलेले आहे. तसेच मराठी भाषा दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने पुस्तक प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन समारंभ, व्याख्यानमाला इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन संस्था करीत असते.

१६. अमराठी भाषकांसाठी उपक्रम
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१०अंतर्गत सदर प्रकल्प संस्थेकडे सोपवण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे २ भाग आहेत.
०१. अमराठी भाषकांसाठी प्रकाशने
०२. अमराठी भाषकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी.
पहिल्या भागांतर्गत अमराठी भाषकांना मराठी भाषेचे ज्ञान करून देण्यासाठी पाठ्यपुस्तके, शब्दकोश इ. निर्माण करणे तसेच इतर प्रकाशने निर्माण करणे अभिप्रेत आहे.
दुसऱ्या भागांतर्गत दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडेल असे मराठी भाषेचे शिक्षण देणे अभिप्रेत आहे.
पहिल्या भागांतर्गत अमराठी भाषकांच्या शाळांत सर्वेक्षण करून पाठ्यपुस्तकांसंदर्भातील गरजा निश्चित करण्याचे काम चालले असून या बाबतचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
दुसऱ्या भागांतर्गत अमराठी भाषकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी या विषयावरील पुस्तकाच्या लेखनाचे काम चालू आहे.

१७. अनुवाद प्रशिक्षण प्रकल्प
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणानुसार अनुवाद प्रशिक्षण योजना राबविण्याचे काम संस्थेकडे सोपविण्यात आलेले आहे. यात मराठी-इंग्रजी, मराठी-हिंदी आणि इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी अशा अनुवादाच्या प्रशिक्षणाचे तसेच अनुवादाविषयक कार्यशाळा/शिबिरे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये वर्षातून चार वेळा असे अनुवाद प्रशिक्षण वर्ग घेण्याचे संकल्पित आहे. याचा लाभ भाषांतरकार, पत्रकार, भाषेचे अभ्यासक/विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनता यांना होईल.

१८. संस्थेच्या प्रकाशनांचे इ-बुक स्वरूपात रूपांतर करण्याचा प्रकल्प
संगणकीय क्रांतीमुळे उपलब्ध झालेल्या नव्या साधनांवर संस्थेची प्रकाशने उपलब्ध व्हावीत या हेतूने संस्थेच्या ६७ प्रकाशनांचे इ-बुक स्वरूपात रूपांतर करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. संस्थेची ही प्रकाशने इ-पब, पीडीएफ अशा विविध संगणकीय पुस्तकस्वरूपांत संगणक, इ-बुक-रीडर, टॅब, सहध्वनिसंच (सेलफोन) अशा विविध यंत्रांवरही सहजपणे वाचण्यासाठी उपलब्ध होत आहेत. सध्या संस्थेची ७ प्रकाशने संस्थेच्या संकेतस्थळावर (https://rmvs.maharashtra.gov.in/EBook.html) उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत.

१९. मराठी दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरण
आजवर प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांपैकी ज्यांच्या स्वामित्व हक्काची मुदत संपली आहे असे मराठी भाषेतील दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिके ह्यांचे संगणककीकरण करून ते महाजालावरून लोकांना उपलब्ध करून देण्यात यावेत अशी सूचना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि समाजजीवन ह्यासंदर्भातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या हेतूने मराठीतील दुर्मिळ पुस्तके आणि नियतकालिके ह्यांचे संगणकीकरण (डिजिटायजेशन) करून ते जनतेला उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प संस्था राबवत आहे. सध्या २८ ग्रंथांचे तसेच नियतकालिकांच्या २६६ अंकांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून ही सामग्री संस्थेच्या संकेतस्थळावरून (https://rmvs.maharashtra.gov.in/DurmilGrantha.html) उतरवून घेता येते. उर्वरित ग्रंथांच्या/ नियतकालिकांच्या संगणकीकरणाचे काम चालू असून तेही संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.

२०. एन. सी. ई. आर. टी. (NCERT) च्या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर प्रकल्प
दिल्ली येथील एन. सी. ई आर. टी.(NCERT) ने प्रकाशित केलेल्या सामाजिक शास्त्राविषयक ६ इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे मराठी अनुवाद करण्याचे काम चालू असून या प्रकल्पांतर्गत आजपर्यत ‘स्वातंत्र्यापासूनचे भारताचे राजकारण’ व ‘भारतीय इतिहासातील काही अभ्यास विषय (भाग १) ’ या २ पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.

२१. दासोपंतकृत गीतार्णव शब्दार्थ संदर्भकोश
कवी दासोपंत यांची 'गीताटीका' म्हणजेच 'गीतार्णव' हा ग्रंथ होय. या ग्रंथाचे १८ अध्याय असून त्यामध्ये १ लाख २५ हजार ओव्या आहेत.
एवढी विस्तृत गीताटीका मराठी भाषेत दुसरी नाही. या ग्रंथात 'गीतेच्या श्लोकांवर' दासोपंत यांनी स्वयंप्रज्ञेने भाष्य (विवेचन) व परमार्थ निरूपण ही मुख्य विषयभूमिका स्वीकारून गीतेच्या श्लोकांच्या निरूपणात रूढार्थातून निराळे अर्थ दिलेले आहेत.
या महत्त्वपूर्ण ग्रंथातून आलेल्या तत्कालीन (मध्ययुगीन) मराठी भाषेचा आकारविल्ह्यानुसार शब्दार्थ संदर्भकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. गीतार्णव या साहित्यकृतीतील मराठी भाषेचे आणि मराठी साहित्याचे मध्ययुगीन कालखंडातील भाषिक वैभव मराठी भाषिकांना कळावे व अभ्यासकांना त्याचा उपयोग व्हावा. तसेच हा ग्रंथ साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यासकांना समजून घेताना अडचण येऊ नये हा या प्रकल्पामागील हेतू आहे.