सद्य प्रकल्प
 

१. दलित - ग्रामीण साहित्य शब्दकोश व सूची

दलित आणि ग्रामीण साहित्य हे आजच्या मराठी साहित्यातील महत्त्वाचे असे दोन प्रवाह आहेत. अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग यांमुळे हे साहित्य काही प्रमाणात नागर वाचकांच्या दृष्टीने दुर्बोधही राहिले आहे.लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही.ह्या साहित्यामधून जे नवनवीन आणि अपरिचित शब्द मिळतात ते प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ, व्याकरणिक तपशिलांसह या कोशात दिले जातील. तो विशिष्ट शब्द असलेले मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या त्या नोंदीमध्येच दिलेले असेल.शब्दकोशांतर्गत निवडलेल्या शब्दांच्या आधारे,दलित-ग्रामीण जीवनाचे सामाजिक अंगाने केलेले विश्लेषण या कोशात असेल. दलित-ग्रामीण साहित्य हे केवळ साहित्य न राहता सामाजिक चळवळीचे एक साधनही झालेले आहे. या चळवळीमागील सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक परिस्थिती यांचा ऊहापोह या कोशात केला जाईल. साहित्याचा सांस्कृतिक अंगाने विचार करताना आवश्यक ठरणारे विधी, रीतिरिवाज यांच्याशी निगडित देव-दैवते, रूढी, परंपरा या विषयींच्या टीपा परिशिष्टांमध्ये पूरक म्हणून देण्यात येतील. सध्या दलित-साहित्यकृतींचे वाचन करून त्यातील अपरिचित शब्दांच्या नोंदी करण्याचे काम संस्थेत चालू आहे. सुमारे २८०० पुस्तके बघून झालेली असून ३३ हजार शब्दांच्या नोंदी करून झाल्या आहेत. संपादक मंडळ व तज्ञ सल्लागार यांच्या नियमित बैठकांद्वारे अर्थनिश्चितीला वेग आला आहे. या शब्दकोशाच्या बरोबरीनेच दलित व ग्रामीण साहित्याच्या सूचीचे कामही संस्थेमध्ये चालू आहे. यामध्ये दलित - ग्रामीण वाङ्मयातील ६००० पुस्तकांची वाङ्मयप्रकारानुरूप वर्णनात्मक सूची प्राथमिक स्वरूपात तयार होत आलेली आहे.

२. वस्त्रनिर्मिति माहितीकोश

विविध व्यवसायांचे शिक्षण सहजपणे मराठीतून उपलब्ध झाल्यास ते भाषिक आणि सामाजिक दृष्टीने फार उपयुक्त होईल असे संस्थेला वाटते. मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात वस्त्रोद्योगाला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान आहे हे लक्षात घेऊन संस्थेने या विषयाचा मराठीतून अभ्यास करू इच्छिणार्‍यासाठी तसेच या विषयाचे मराठीतून शिक्षण घेणार्‍यासाठी व त्यावर मराठीतून लेखन करणार्‍यांसाठी उपयुक्त ठरेल असा वस्त्रनिर्मितिमाहितीकोश तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्थेच्या सहकार्याने हे काम चार-पाच वर्षे चालू आहे. भारतीय भाषांमध्ये आजमितीस तरी अशा प्रकारचा कोश नाही. त्यामुळे मराठीमध्ये तो तयार झाल्यास मराठीच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात ही एक अजोड कामगिरी ठरेल. सदर माहितीकोश पुढीलप्रमाणे आठ खंडांमधून प्रकाशित होईल:
१) तंतुनिर्माण व तंतुविज्ञान २) सूतनिर्माण ३) वस्त्रनिर्माण ४) वस्त्रनिर्माणातील रासायनिक प्रक्रिया ५) वस्त्रप्रावरणे व तंत्रोपयोगी वस्त्रे ६) वस्त्रोद्योग व्यवस्थापन ७) वस्त्रसंकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार ८) वस्त्रोद्योग परिभाषाकोश
 या खंडांपैकी `तंतुनिर्माण  व तंतुविज्ञान  व सूतनिर्माण़' हे पहिले दोन खंड फेब्रुवारी ०७ मध्ये प्रकाशित झाले असून उर्वरित खंड लवकरच प्रकाशित होतील.

३. मराठी ग्रंथसूचीमाला (१९५१-२०००)

कै. शं. ग. दाते यांनी १९५० पर्यंतच्या मराठी ग्रंथांची सूची दोन खंडांत तयार केलेली आहे. परंतु सन १९५० नंतर मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एकत्रित अशी विषयवार ग्रंथसूची अजून तयार झालेली नाही. ही उणीव दूर करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने 'मराठी ग्रंथसूचीमाला' हा प्रकल्प घेतला असून त्यात सन १९५१ ते २००० या कालखंडातील ग्रंथांची सूची श्री.शरद साठे व इतर काही संपादकांकडून करून घेण्यात येत आहे. या मालेत एकूण ६ खंड प्रकाशित होणार असून पहिल्या खंडाचे (१९५१-१९६२) प्रकाशन ऑक्टोबर २००१ मध्ये झाले. उर्वरित खंडांचे काम चालू असून दुसरा खंड (१९६३-७०) मार्च २००६ मध्ये प्रकाशित झाला असून उर्वरित खंडांचे काम चालू आहे.
४. बृहन्महाराष्ट्रासाठी केले जाणारे कार्य
मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश इत्यादी प्रांतांतील मराठीच्या स्थितिगतीचा विचार करीत असते. १९९४ पासून संस्थेने आंध्रप्रदेशातील व मध्यप्रदेशातील मराठी पाठ्यपुस्तकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातले असून तेथील विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. याच प्रकारचे काम गुजरात राज्याच्या संदर्भात संस्था आवश्यकतेनुसार करीत आहे. बृहन्महाराष्ट्रातील मराठी वाचकांना दर्जेदार मराठी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत या उद्देशाने संस्थेने २००३ पासून `ग्रंथालयांना पुस्तक भेट' हा उपक्रम हाती घेतला आहे. आजपर्यंत हैद्राबाद, बेळगाव, भोपाळ, सुरत, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, राजस्थान, रायपूर, इंदूर, राजकोट, जबलपूर आदी ठिकाणच्या २३ ग्रंथालयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट म्हणून पाठविण्यात आली आहेत. मा.मुख्यमंत्री यांनी अमेरिकेतील मराठी मंडळांना दिलेल्या आश्वासनानुसार शासनाच्या वतीने राज्य मराठी विकास संस्थेने तीन वर्षे ललित साहित्याची पुस्तके या मराठी मंडळांना पाठवली आहेत.

५. विधी व न्याय व्यवहारात मराठीचा वापर

महाराष्ट्र शासनाने निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीचे सदस्यत्व संस्थेला देण्यात आलेले असून या सर्व कामामध्ये भाषिकदृष्टया गुणवत्ता निर्माण व्हावी यासाठी संस्था त्यांना सहकार्य करते.

६. संगणकावर मराठी

संगणकावर मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी संस्था प्रयत्‍नशील आहे. विषेशतः प्रमाणीकरण (स्टॅन्डर्डायझेशन) व कन्व्हर्जन या कामी संगणक तज्ज्ञांना भाषिकदृष्टया मार्गदर्शन करण्याचे कार्य संस्थेने केले आहे.कळफलकाच्या एकरूपतेसाठीही मराठी वर्णमालेचे प्रमाणीकरण करून दिले आहे.तसेच मराठीतील अकारविल्हे रचना (sorting orders) निश्चित करणे आवश्यक होते. ही गरज ओळखून संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सहकार्याने भाषा व संगणक तज्ज्ञांशी सखोल चर्चा करून त्यासंबंधी काही बाबी निश्चित केल्या असून त्यासंबंधीचा अहवाल अंतिम निर्णयासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठविला आहे.महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आखलेल्या `लॅग्वेज टेक्नॉलॉजी व्हिजन २०१०'या प्रकल्पामध्ये राज्य मराठी विकास संस्था निमंत्रक संस्था म्हणून सहभागी झालेली असून आय.आय.टी., एन.सी.एस.टी, सी-डॅक या संस्थांबरोबर या प्रकल्पांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यरत आहे.

७. पालघर तालुक्यातील बोलीभाषांचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास

राज्य मराठी विकास संस्था आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,पालघर यांचा संयुक्त उपक्रम. मुंबईजवळील पालघर तालुक्यामध्ये अनेकविध बोली बोलल्या जातात. या बोलींचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास करून त्याचे भाषाशास्रीय दृष्टिकोनातून निष्कर्ष अभ्यासून एक संदर्भग्रंथ तयार केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी, आगरी, कुणबी,भंडारी, वाडवळ व मच्छिमार या बोली व त्यांचे इतर भिन्न प्रकार बोलत असलेल्या समाजाविषयीची सविस्तर माहिती या ग्रंथामध्ये दिलेली असेल. या समाजाची आडनावे, त्यांचे सण, शेती, शिकारीची पद्धत, जीवनशैली, संस्कार, गीते, शब्द-वाक्ये-म्हणी, समजुती, अंधश्रद्धा, गाव, परिसर इत्यादी अनेक मुद्दयांवर माहिती संकलित करुन त्यावरुन लेखनाचे काम पूर्ण झाले असून प्रकाशनपूर्व संपादनाचे काम सध्या चालू आहे.

८. फार्सी- मराठी व्युत्पत्तिकोश

मध्ययुगीन व वर्तमानकालीन मराठीमध्ये असंख्य अरबी, तुर्की, फारसी शब्द आहेत. १४ व्या शतकापासून या शब्दांचा मराठीत समावेश झाला. तेव्हापासून आजपर्यंत हे शब्द मराठी भाषेत रुजले, स्थिरावले. ते आता मराठी संस्कृतीशी एकरूप एकजीव झाले असून त्यांचे एकपरीने मराठीकरण झालेले आहे. मराठी वाङ्मयाचाच विचार केला तर संत वाङ्मय, ऐतिहासिक पत्रात्मक गद्य, बखर वाङ्मय, शाहिरी वाङ्मय ते आजच्या वृत्तपत्रीय लेखन, कायदा, शासनव्यवहार या सर्वच बाबतीत या शब्दांचे अस्तित्व जाणवण्यासारखे आहे. मराठी व फार्सीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. यू.म.पठाण हे या व्युत्पत्तिकोशाचे काम करीत आहेत. या व्युत्पत्तिकोशात त्या शब्दांची व्युत्पत्ती, उच्चारण, कालमानानुसार त्यांना प्राप्त झालेला नवा अर्थ इ. अनेक बाबींचा ऊहापोह केलेला आहे. लवकरच राज्य मराठी विकास संस्थेतर्फे या व्युत्पत्तीकोशाचे प्रकाशन केले जाईल. ज्यांना मध्ययुगीन फर्माने, सनदा, ऐतिहासिक पत्रे, दप्तरे, बखरी इ.चे अध्ययन-संशोधन करायचे आहे त्यांना तर हा कोश उपयुक्त वाटेलच, परंतु आजच्या मराठीच्या विविध बोलींच्या अभ्यासकालाही त्याचा उपयोग होईल.

९. मोडी हस्तलिखितांचे देवनागरीकरण

तंजावूर येथील सरस्वती महाल ग्रंथालय व तमिळ विद्यापीठ येथे अनेक मोडी हस्तलिखिते उपलब्ध आहेत.या हस्तलिखितांचे देवनागरीकरण करण्याचा प्रकल्प संस्था लवकरच हाती घेणार आहे.या हस्तलिखितांचे देवनागरीकरण झाल्याने आतापर्यंत अनुपलब्ध असलेल्या वाङ्मयाचा मोठा साठा अभ्यासकांना उपलब्ध होईल.

१०. दासोपंतांच्या गीतार्णव संबंधीचा प्रकल्प

दासोपंतांच्या गीतार्णवातील ओव्यांचा अन्वय लावून आवश्यक त्या अवघड शब्दांचा अर्थ यात दिलेला असेल. सदर प्रकल्प संस्थेचे उपसंचालक डॉ. सतीश कुलकर्णी यांचेकडे सोपविला आहे

११. शासकीय प्रकाशनांचे प्रदर्शन

शासकीय विभाग तसेच शासनपुरस्कृत संस्था उत्तम, दर्जेदार पुस्तके प्रकाशित करत असतात. तथापि ती सर्वसामान्य वाचकांपर्यत पोहोचत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. सन २००२ हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय पुस्तकवर्ष म्हणून जाहीर केले होते. त्याचे निमित्त साधून संस्थेने पहिल्यांदा शासकीय विभागांनी व शासनपुरस्कृत संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित केले. त्यानंतर अशा प्रकारची चार प्रदर्शने मुंबई, ठाणे, वाशी व पुणे येथे आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनांना लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशी प्रदर्शने आयोजित करण्याचा संस्थेचा विचार आहे.

१२. इतर प्रसंगोपात्त उपक्रम

मराठीचा गुणवत्तापूर्वक विकास करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील मराठीचा वापर वाढविण्यासाठी संस्था वेळोवेळी अनेक चर्चासत्रे, कार्यशाळा, सर्वेक्षणे आयोजित करीत असते. वर नमूद केलेल्या उपक्रमांखेरीज अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व भाषाविषयक प्रकल्प संस्थेच्या विचाराधीन आहेत.नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रकल्प हाती घेण्यात येतील. राज्य मराठी विकास संस्थेला आजवर अनेक व्यक्तींचे व संस्थांचे आणि शासनाचे चांगले सहकार्य लाभलेले आहे. तसेच सहकार्य पुढील काळातही मिळत राहील अशी अपेक्षा आहे.मराठी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी जेवढी शासनाची तेवढीच सर्वसामान्य मराठी भाषिकांचीही आहे. भाषेचा विकास आणि भाषिकांचा विकास या एकमेकांशी निगडीत असणार्‍या गोष्टी आहेत.या दोन्ही घटकांचे सुजाण साहचर्य निर्माण करीत आपल्याला विविधांगी प्रगतीची वाट चालावी लागणार आहे. मानवी व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्राचा `भाषा' हा एक महत्त्वाचा अंगभूत घटक आहे हे ध्यानात घेऊन संस्था आपले एकेक कार्यक्षेत्र ठरवून उपक्रम हाती घेत जाईल. सर्व मराठी माणसांची आस्था,कर्तव्यबुद्धी आणि उपक्रमशीलता यांना देशातील व प्रांतातील आजच्या भाषिक परिस्थितीने आव्हान दिलेले आहे. त्यांनी ते मोठया जिद्दीने पेलून दाखविणे फार गरजेचे आहे.विविध योजनाबद्ध उपक्रमांचे सातत्य राखल्यास आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखणार्‍या आस्थेवाईक वृत्तीच्या लोकांचे सहकार्य मिळविता आल्यास आजच्या भाषाविषयक परिस्थितीत अपेक्षित बदल घडू शकेल, असा विश्वास राज्य मराठी विकास संस्थेला वाटतो.
 
Photogallery Contact us Feedback Sitemap